अयोध्येत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली असतानाच तब्बल ३१ तासांचा प्रवास करुन शिवसैनिक ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी अयोध्येत दाखल झाले आहेत.
अयोध्येत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेली असतानाच तब्बल ३१ तासांचा प्रवास करुन शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसैनिकांची अयोध्या विशेष ट्रेन शुक्रवारी रात्री १० वाजता अयोध्येत पोहोचली. शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे स्वागत केले.
इतक्या तासांचा प्रवास करुन आल्यानंतरही शिवसैनिकांचा उत्साह तूसभरही कमी झालेला दिसला नाही. ट्रेन अयोध्येत दाखल होताच ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सहकुटुंब अयोध्येत दाखल होणार आहेत. सकाळी विशेष विमानाने ठाकरे कुटुंब अयोध्येसाठी रवाना होईल.
दुपारी दोन वाजता हे विमान फैझाबाद विमानतळावर उतरेल. या प्रवासात उद्धव यांच्यासोबत त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरही असतील. शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठया संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. येत्या रविवारी २५ नोव्हेंबरला भव्य राम मंदिर निर्माणाच्या संकल्पासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होईल. अयोध्येमधील ही गर्दी आणि वातावरण पाहून अनेकांच्या मनात ६ डिसेंबर १९९२ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अयोध्येला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असून सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे.