MH News Marathi
Hindi News Portal

निलंबित पोलीस उपनिरीक्षकाकडून लाच घेताना कपडे व्यापाऱ्याला अटक झाली आहे.

मुंबई :

कालच साकीनाका पोलीस ठाण्यातील पोलिसाला पानटपरीवाल्याकडून २ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली होती. मात्र समता नगरमध्ये निलंबित पोलिसाकडूनच लाच घेतल्याची घटना घडली आहे. एका निलंबित पोलीस उपनिरीक्षकाकडून लाच घेताना कपडे व्यापाऱ्याला अटक झाली आहे. रविश प्रेमजी शाह असं आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने निलंबित पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण यांच्याकडे दीड लाख रुपयाची लाच मागितली होती.

या प्रकरणात आधी बिपिन चव्हाणने रविश प्रेमजी शाह या कपडे व्यापाऱ्याकडे सेटलमेंटच्या एका प्रकरणासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागितली होती. रविश शाहने एसीबीकडे तक्रार करून पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाणला लाच घेताना सापळा लावून अटक केले. निलंबित झाल्यानंतर बिपिन चव्हाण कार्यालयात हजेरी लावण्यासाठी यायचा. काही दिवसांनी कपडे व्यापारी आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यामधील मध्यस्थाने पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याशी चर्चा करून प्रकरण मिटविण्यासाठी रविश शाह याच्याशी चर्चा केली. त्यावेळी शाहाने आरोपी पोलीस उपनिरीक्षकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. दीड लाखापैकी २५ हजाराचा पहिला हप्ता देण्याचे शाहच्यावतीने मध्यस्थाने पोलीस उपनिरीक्षकाला सांगितले. मात्र, तडजोडअंती २५ हजार नाही १५ हजार रुपये ठरले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपी व्यापारी रविश शाहला समता नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बेड्या ठोकल्या. लाचखोरीच्या प्रकरणात आधी कपडे व्यावसायिक फिर्यादी आणि पोलीस आरोपी होता. मात्र, आता फिर्यादी आरोपी आणि आरोपी पोलीस फिर्यादी ठरल्याचा चक्रावून टाकणारा प्रकार समोर येत आहे. दरम्यान, आरोपी रविश शाहची जामिनावर सुटका झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358