MH News Marathi
Hindi News Portal

शासकीय व निमशासकीय संस्थांना महाराष्ट्र दिनाची अँलर्जी

गोपाल वाढे,प्रतिनिधी / शिरपूर :१ मे हा दिवस राज्यभरातून महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना कचेर्‍यातून, शाळा – बँकातून हा महाराष्ट्र दिन साजरा होणे अपेक्षित असते. मात्र शहरातील काही बँका व इतर कार्यालयात ध्वजारोहण न झाल्याने जनतेते रोष निर्माण झाला आहे.
दिनांक १ मे रोजी शिरपूर शहरात महाराष्ट्र दिनाचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय, निमशासकीय शाळा, कार्यलये आणि आस्थापनातून ध्वजारोहण करून, ध्वजाला मानवंदना देऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे काही कार्यालये आणि बँकांनी मात्र महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाकडे सपशेल पाठ फिरवली.
आमच्या स्थानिक प्रतिनिधीने या महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाचा आढावा घेतला असता स्थानिक पोस्ट ऑफिस,तलाठी कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र, जनता बँक, विदर्भ कोकण ग्रामिण बँक इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण केले नसल्याचे निदर्शनास आले. अनेक जागरूक नागरिकांच्या लक्षात ही बाब आली आणि ही बाब त्यांनी ताबडतोब स्थानिक प्रतिनिधीच्या कानावर घातली.
राष्ट्रध्वज हा संपूर्ण राष्ट्राचा असतो. या राष्ट्रध्वजाच्या रोहणाने आपली किंमत कमी होत नसते. तर उलट या कार्यक्रमांतून राष्ट्रप्रेम वृद्धिगंत होत असते. हा महाराष्ट्र दिन किंवा राष्ट्रीय उत्सवासंदर्भात वरिष्ठा कार्यालयाचे निर्देश काहीही असो. ध्वजारोहण करण्यात स्वयंस्फुतीर्ने पुढाकार घेण्यात गैर ते काय? १0६ आंदोलकांनी आपले रक्त सांडून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी केली. त्यांच्या बलीदाना बद्दल आपण एवढे उदासिन का? महाराष्ट्राची अस्मिता आपण अशा कृतघ्नतेतूनच जतन करणार आहोत का? अशा अनेक प्रश्नातून जागरूक नागरिकांनी आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली आहे. एकंदर महाराष्ट्रातील काही कार्यालये, आस्थापन अशा प्रकारे वागत असल्याने जनतेत नाराजीचा सूर असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358